इंटरनेट कधीकाळी खुप मोठं अप्रुप होतं, त्यावेळी तासाला वीस रूपये देऊन कॅफेमध्ये जात नेट सर्फिंग करायचे. मोबाईलद्वारे आज झालेली सुलभ डिजिटल क्रांती त्यावेळी सर्वत्र उपलब्ध नव्हती, आणि असली तरी डेटा 150 ते 200 एमबी मिळायचा आणि वेब लोडिंग होईपर्यंत त्याकडे पाहत बसायला लागायचे. आजच्या डिजिटल क्रांतीचा झालेला विकास थक्क करणारा आहे. सिंगल टच केलं की मल्टीपल अ‍ॅप्लिकेशन समोर उभे राहतात.

मोबाईल क्रांती देखील किपॅड – मल्टीमिडिया ते आजचे स्मार्ट फोन अशी झाली आहे. त्यापूर्वी देखील पेजर होते. पण, एवढ्या खोलात आपण जायला नको. तरीही मोबाईलमध्ये एफएम आहे म्हणून आनंदाने उड्या मारणारी पिढी ते आज लाईव्ह स्ट्रीमिंग आणि कॉन्सर्ट असे झालेले ट्रान्झिशन निव्वळ कमाल आहे.

स्मार्ट फोन मानवी आयुष्याला वेगवान जगाशी सदैव कनेक्टेड ठेवणारा महत्वाचा दुवा बनला आहे. स्मार्ट फोन शिवाय राहणे आजकाल अशक्यप्राय झालयं. लाखोंच्या संख्येने उपलब्ध असलेली ‘गुगलबाबा’ची माहिती, विषय आणि आशय याप्रमाणे युट्युबवर मिळणारे ढीगभर व्हिडिओ, कोणत्याही प्रकारचे लाईव्ह स्ट्रिमिंग. ओटीटीवर प्रसिद्ध सिरीज किवा चित्रपट एका क्षणात मोबाईलवर पाहण्याची सुविधा, आजकाल उपलब्ध झालीय.

सोशल मिडियाची कमाल तर बाप आहे असे म्हणायला आज वाव आहे. कारण एकच की फेसबुक म्हणू नका, इन्स्टाग्राम, ट्विटर, टीक टॉक, स्नॅपचॅट, कू अ‍ॅप, टींडर, लिंक्डइन यापासून हजारो डेटींग अ‍ॅप, मॅट्रीमोनिएल साईट आणि बरचं काही. असे सोशल मिडियाचे प्रगल्भ आणि मोठे जाळे विकसित झाले आहे.

मनोरंजनाचे साधन म्हणून एकेकाळी टीव्ही शिवाय पर्याय नव्हता त्याची जागा आता मोबाईने घेतली असून, टीव्ही देखील स्मार्ट व्हायला लागला आहे. थोडक्यात तंत्रज्ञानाचा विस्तार झपाट्याने होत असून, फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ते लोकांपर्यंत देखील पोहोचत आहे.

वीस रूपयांना 150 एमबी इंटरनेट डेटा मिळायचा तो 2G चा काळ होता. आता 4G सुरू असून, 5G ची चाचपणी केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर त्याची अमंलबजावणी केलीय. पाचशे ते सहाशे रूपयांत तीन महिने अमर्यादीत डेटा किंवा दीड ते दोन जीबी डेटा आजकाल प्रत्येक कंपनी पुरवत आहे. बक्कळ डेटा आणि वारेमाप केन्टेन्ट यामुळे मोबाईच्या सरकत्या स्क्रिनसमोर आजकालच्या तरूणाईचे आरामात दिवस जात आहेत. पण, यात मोठं नुकसान देखील आहे.

8 Money Saving Tips : मोबाईल, सोशल मिडिया, रिल्स यातून वेळ काढा अन् पैसे वाचवा; आठ महत्वाच्या टीप्स

फेसबुक असो किंवा इन्स्टाग्राम असो आजची तरूणाई तासंतास त्यावर आपला वेळ वाया घालवत आहेत. यातून रिल्स स्टार्सना ऊत आले आहे. कॉलेज विद्यार्थी अभ्यास करण्याच्या वयात झटपट प्रसिद्धी मिळविण्याच्या मागे लागले आहेत. प्रसिद्धी मिळाली की पैसा येतो ओळख मिळते यामुळे काहीसी विचलित झालेली आजची तरूणाई आभासी जगाकडे जास्त झुकलेली दिसते.

आपले ध्येय स्पष्ट असणारे तरूण आजकाल अपघाताने पाहायला मिळतात. पदवी पूर्ण केल्यानंतर आता काय व्यवसाय करायचा असा विचार करणारी आजची तरूणाई असून, ही परिस्थिती विदारक आहे. youtube वरून वरवरचे ज्ञान घेऊन अर्ध्या हळकुंडाने हुशार झालेली आजची पिढी थोक्याची घंटा आहे.

सेल्फ लर्निंगचा काळ असला तरी त्यातून येणाऱ्या प्राथमिक ज्ञान आणि माहितीला अनुभव व प्रात्यक्षिकाची जोड महत्वाची आहे. भरमसाठ पदव्या आणि कौशल्याचा अभाव यामुळे नोकरी मागण्यासाठी गेलेल्या उमेदवाराचा निभाव लागत नाही. यापेक्षा अजून एक विदारक सत्य ग्रामीण भागात पाहायला मिळते. ते म्हणजे कॉलेज सर्वजण पूर्ण करतात म्हणून इतर देखील जातात. कला तथा वाणिज्य पदवी घेतल्यानंतर पुण्यात जाऊन महिंद्रा, फोर्ड, टाटा किंवा तत्सम उत्पादन कंपनीत असेम्बली लाईन किंवा हेल्पर म्हणून आठ दहा हजारांवर काम करतात.

कोणत्या अवडीच्या क्षेत्रात काम करायचे यावर कोणती कौशल्य आवश्यक आहे हे ठरत असते त्यानंतर संबधित विषयाचे शिक्षण घ्यावी अशी साधारणत: पद्धत आहे. पण याची सुतराम कल्पना आपल्या तरूणाईला नाही, किंवा ती जाणून घ्यायची त्यांची ईच्छा नाही. आणि दररोज मिळणाऱ्या दीड ते दोन जीबी डेटामुळे कोणाला समजून घ्यायला वेळ नाही.
सर्वकाही असेच आहे असंही नाही पण…?

सर्वकाही असेच चित्र आहे असेही नाही. अनेकजण नवे नवे प्रांत धुंडाळत आहेत. त्यात यश देखील प्राप्त करत आहेत. शिक्षणाचे दरवाजे मोठ्या प्रमाणावर खुले झाल्याने त्याचा फायदा तरूण घेताना दिसत आहेत. त्यातून अनेकांनी उत्तम करिअर साकारले असल्याची देखील उदाहरणे आपण पाहिली आहेत.

पण, एखादा ट्रेन्ड आला की त्यामागूनच पळणारी सवय काहीकेल्या बंद होताना दिसत नाही. अलिकडे डेटा सायन्स, डेटा अ‍ॅनालिस्ट आणि सॉप्टवेअर टेस्टिंग यासारखे कोर्स थोड्याच काळात प्रसिद्ध झाले. सहा महिने कोर्स करा आणि आयटीत मोठ्या पॅकेजची नोकरी मिळवा अशी जाहिरातबाजी देखील झाली.

अनेकांनी आयटीत काम करायचे म्हणत फिल्ड चेंज केली आणि कोर्स केले पण, हाती फारसेकाही लागले नाही. तर अनेकांना उत्तम संधी मिळाली. पण, हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्याची प्रवृत्ती तुमच्यासाठी नुकसानकारक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

थोडक्यात आज प्रत्येकाच्या हातात प्रगत तंत्रज्ञान आहे. जगात काय सुरू आहे याची क्षणार्धात माहिती मिळत आहे. अशात हातात असणाऱ्या दीड ते दोन जीबी डेटाचा वापर तुमच्या सत्कारणी लागयला हवा ना की गेम्स आणि फालतू व्हिडिओ पाहण्यात ते घालवायला हवे. ढीगभर असणाऱ्या व्हिडिओ माहितीमधून आपल्याला निवडक वेचता यायला हवे. प्राधान्यक्रम ठरवता यायला हवा, नाहीतर लक्ष विचलित करणाऱ्या असंख्य नोटीफिकेशन मोबाईलवर येतच राहतील. नाही का?? शेवटी चॉईस इज युवर्स…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed