Goa And Manipur Violence: गोव्यात मणिपूर सारखी दंगल होण्याची शक्यता आहे. आणि त्याचीच सध्या तयारी सुरू आहे. अशा आशयाचा लेख, गोव्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एका नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी चिखलीतील ख्रिस्ती धर्मगुरूविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी गेल्या आठवड्यात जोर धरू लागली. शिवप्रेमी आणि हिंदू समाजातील लोकांनी यासाठी वास्कोत निदर्शेने केली. अखेर धर्मगुरू बोलमॅक्स परेरा यांच्या विरोधात शिवप्रेमींच्या भावना दुखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

ही घटना ताजी असतानाच हा लेख प्रसिद्ध झाला असल्याने या लेखाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. गोव्यात जाणीवपूर्वक दंगल घडविण्यासाठी असे वातावरण निर्माण केले जात असून, त्यातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे. असा आरोप या लेखातून केला आहे.

गोवा आणि दीव दमण आर्कडायोसीसच्या ‘रिनिव्हल नोव्सोर्नी रेनोव्हाकाओ’ या नियतकालिकात एफ ई नोरोन्हा यांनी हा लेख लिहला आहे. (Renewal Novsornni Renovação Pastoral bulletin of the Archdiocese of Goa and Daman)  नोरोन्हा रेनोव्हाकाओच्या संपादकीय मंडळाचे सदस्य आहेत. डायोसेसन सेंटर फॉर सोशल कम्युनिकेशन्स मीडिया (DCSCM) द्वारे आर्चबिशप हाऊस, अल्तिनो, पणजी येथून हे बुलेटिन प्रकाशित केले आहे.

निलतकालिकात प्रसिद्ध झालेला हा लेख नक्की काय?

‘जागतिक युवा दिना’ला (Renewal Novsornni Renovação) समर्पित हे बुलेटिन 1-15 ऑगस्ट या कालावधीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. “रात्रीच्या पार्ट्यांमध्ये मते वाया घालवल्यानंतर आम्हाला राजकीय मूर्खपणाचे मिळायचे ते फळ मिळाले आहे. पराभवामुळे पक्षांतरांची दुसरी फेरी सुरू झाली.”

“गोवा म्हादईच्या उथळ पाण्यात बुडत असताना, आमचे तरूण येथील सरकार, व्यवसाय चालवण्याऐवजी इतरांची सेवा करण्यासाठी परदेशात जाण्यात व्यस्त आहेत.”

“पोर्तुगीज संस्कृतीच्या खुणा नष्ट करण्यााबाबत बोलले जात आहे, ही येऊ घातलेल्या हिंसाचाराची तयारी आहे. गोमन्तकीयांनी संघटित होण्याची गरज आहे… नाहीतर ते नष्ट होतील’. 1967 मध्ये तुमच्या आजोबांनी गोव्याची सुटका केली. आज डॉ. जॅक सिक्वेरा (Dr. Jack Sequeira) नाहीत, गोवा एकसंघ नाही.”

“पण परिस्थिती आवश्यक नेतृत्व निर्माण करेल आणि संकटांनुसार माणसे पुढे येतील. हे संकट आहे, आता कोणतीही चूक करू नका. तुमची चर्च उध्वस्त होऊ शकतात, तुमच्या धर्मगुरूंना मारहाण केली जाऊ शकते आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या…!” असे डॉ. एफ. ई. नोरोन्हा यांनी बुलेटिनमधील लेखात लिहले आहे.

“तुमच्यात थोडे जरी काही ज्ञान शिल्लक असल्यास, तुमच्या सुखर जीवनशैलीतून थोडा वेळ काढा, आणि तुमच्या भूमीच्या भवितव्याबाबत विचार करा. स्विंदोनमध्ये गोव्याला वाचवता येणार नाही, त्याला इथेच वाचवावा लागेल. दोन पिढ्या पूर्वी गोव्याचे लोक दुसऱ्या राज्यात विलीन करण्याचा प्रयत्न करत होते.”

“आमच्या राजकारणी लोकांनी सांप्रदायिक साच्यातून बाहेर पडून धर्मनिरपेक्ष पक्षात सामील व्हावे. देशाला विभाजित नव्हे तर एकत्र करण्याची गरज आहे. राजकारणात द्वेषाची नव्हे तर प्रेमाची गरज आहे. असे असे बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
गोवावासीयांनी पोकळ अहंकार बाजूला ठेवून एकत्र यावे, अहंकार निरर्थक आहेत.”

“तुमच्याकडे अभिमान बाळगण्यासारखं काहीच नाही, गेल्या 40 वर्षात तुम्ही गोवा उद्ध्वस्त केला आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही धर्मनिरपेक्ष लोकांना एकत्र आणत, राज्यातून दोन धर्मनिरपेक्ष प्रतिनिधी दिल्लीत पाठवा.” असेही या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा आणि दोन महिन्यात गोव्यात दोन वाद

पहिली घटना

कळंगुट-साळगाव या मार्गावरील कळंगुट पोलिस स्थानकाच्या जंक्शनवर शिवस्वराज्य कळंगुट संस्थेकडून शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळा उभारण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या नाहीत असे कारण देत, हा पुतळा हटविण्यात यावा अशी नोटीस पंचायतीकडून 19 जून रोजी शिवस्वराज्य संस्थेला बजावण्यात आली.

नोटीस बजावल्यानंतर हिंदू संघटना सक्रीय झाल्या आणि 20 जून रोजी कळंगुट पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करत निदर्शन केले. हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल पंचायतीचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमींनी येथे घोषणाबाजी केली. दिवसभर या परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. अखेर सायंकाळी संरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पंचायतीसमोर येत शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

दुसरी घटना

वास्को-चिखली येथील एसएफसी चर्चमध्ये उपदेश करताना ख्रिस्ती धर्मगुरू फादर बोलमॅक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय हीरो पण देव नाही. शिवाजी महाराजांना देव करणाऱ्या हिंदू लोकांनी आम्ही समजवायला हवे असे वक्तव्य परेरा यांनी 01 ते 02 ऑगस्ट या कालावधीत केले. असे वक्तव्य असलेला त्यांना उपदेश युट्यूब वरती प्रसिद्ध करण्यात आला. दरम्यान, परेरा यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला.

शिवप्रेमींची भावना दुखावल्याप्रकरणी याबाबत पहिल्यांदा काणकोण येथे परेरा यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली. त्यानंतर शुक्रवारी रात्री परेरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याप्रकरणी त्यांनी अटक केली जावी अशी मागणी करत हिंदू जमाव वास्को पोलीस स्टेशन समोर गोळा झाला.

प्रचंड संख्येने आलेल्या हिंदू समाजातील नागरिकांनी वास्को पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत माघार नाही अशा भूमिकेत असलेल्या शिवप्रेमींच्या मागणीनंतर अखेर उशीरा परेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

परेरा यांच्या वक्तव्याचे पडसाद विधानसभेत देखील उमटले

गोव्याचे पावसाळी अधिवेशन (Goa Assembly Monsoon Session 2023) सुरू झाल्यापासून विरोधी पक्षातील आमदार मणिपूर हिंसाचारावर (Manipur Violence) चर्चेची मागणी करत आहेत. वारंवार प्रस्ताव पुढे ढकल्यानंतर शुक्रवारी अखेर विरोधकांनी चर्चेची मागणी लावून धरली. पण, सभापतींनी हा खासगी ठराव फेटाळून लावला.

प्रस्ताव फेटाळल्याप्रकरणी विरोधक सभापतींपुढे घोषणाबाजी करत असताना, मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी विरोधकांना सभागृहाचा वेळ वाया घालवायचा आहे असा आरोप केला. शिवाय परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्याचा दाखला देते दोन्ही विषय संवेदनशील असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed