Goa Assembly Monsoon Session 2023: गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (दहावा दिवस) मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा विरोधकांनी चांगलाच उचलून धरला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना घेरले आणि त्याचवेळी सभागृहात प्रश्न मांडत असलेल्या मगोच्या जीत आरोलकर यांच्यासोबत धक्काबुक्की केली. अखेर मार्शल्सच्या मदतीने विरोधी पक्षातील आमदारांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.

सत्ताधाऱ्यांनी विरोधी आमदारांवर तात्काळ कारवाईची मागणी लावून धरली आणि सभापती रमेश तवडकर यांनी सातही विरोधी पक्षातील आमदारांवर दोन दिवसांसाठी निलंबनाची कारवाई केली. पण, विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विनंती केल्यानंतर दिवसाअखेर सभापतींनी निलंबनाची कारवाई शिथील केली आणि त्याचा कालावधी 24 तास एवढा केला.

दुसऱ्या दिवशी निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर विरोधी पक्षातील आमदार सभागृहात दाखल होताच त्यांनी पुन्हा मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा उचलून धरला. पोस्टर दाखवत, घोषणाबाजी केली. विरोधक सभापतींच्या वेलमध्ये गेले आणि गोंधळ घातला.
‘मणिपूर हिंसाचाराची स्वेच्छा दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, या गंभीर प्रकरणाची सभागृहात चर्चा व्हायला हवी. अर्धा तास का होईना पण, चर्चा व्हायला हवी.’ असे मत आमदार विजय सरदेसाई यांनी मांडले.

कोणत्या आमदरांचे केले निलंबन?
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विजय सरदेसाई, व्हेंझी व्हिएगश, वीरेश बोरकर, क्रुझ सिल्वा, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्ता असे सात आमदारांचे निलंबन करण्यात आले.

सोमवारी सभागृहात नेमकं काय घडलं?
अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी विरोधी पक्षातील सात आमदार, मणिपूर हिंसाचाराच्या निषेर्धात काळे कपडे परिधान करून सभागृहात आले. आपचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी आणलेल्या मणिपूर हिंसाचारावरील खासगी ठरावावर चर्चेची मागणी विरोधकांनी केली. दरम्यान, हा ठराव वगळण्यात आला.

त्यावरून विरोधक आक्रमक झाले आणि पोस्टर दाखवत, घोषणाबाजी करून सभागृहात गोंधळ घातला. पोस्टर घेऊन आमदरांनी सुरूवातीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना घेरले आणि सेव्ह मणिपूरचे पोस्टर दाखवले. त्यानंतर आमदार सभापतींच्या वेलमध्ये जात घोषणाबाजी करू लागले.

यावेळी भाजपच्या संकल्प आमोणकर यांना बोलण्याची संधी सभापतींनी गोंधळातच आमोणकर बोलून थांबले. त्यांनतर मगोच्या जीत आरोलकरांना बोलण्यास सांगितले असता, विरोधकांनी आरोलकरांना घेराव घातला आणि त्यांच्या बोलण्यात अडथळा निर्माण केला. यावेळी सरदेसाई यांनी आरोलकरांच्या माईकमध्ये मणिपूरsss मणिपूरsss अशा घोषणा दिल्या.

तसेच, आरोलकरांच्या टेबलवरील कागदपत्रे हवेत उडवली शिवाय एका मार्शलची टोपी काढून आरोलकरांना घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर मार्शल्सनी सातही विरोधकांना सभागृहाच्या बाहेर काढले.

मुख्यमंत्री सत्ताधारी आमदार आक्रमक
या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री, सत्ताधारी पक्षातील आमदार आक्रमक झाले आणि तात्काळ कारवाईची मागणी केली. सभापती तवडकरांनी याबाबत मंगळवारी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले पण, सत्ताधारी बाकावरील सर्वच कारवाईच्या मागणीवर ठाम राहिल्याने सभापतींनी नियम 289 अन्वये निलंबनाची कारवाई केली. सुरूवातील निलंबन कारवाईचा कालावधी दोन दिवसांचा होता मात्र, दोन्ही कडील वरिष्ठ नेत्यांनी विनंती केल्यानंतर निलंबनाचा कालावधी 24 एवढा करण्यात आला.

विजय सरदेसाई काय म्हणाले?
‘सभागृहातून आमचे निलंबन तत्वशून्य, लोकशाही विरोधी आणि गोंयकरांचा अपमान आहे. गोवा भाजप आमच्या प्रश्नांना उत्तर का देऊ शकत नाही? लोकांच्या भीतीला ते आश्वस्त का करू शकत नाहीत? त्यांना मणिपूर हिंसाचारामागील सत्याची भीती वाटते का विधानसभेतील विरोधकांची?’ अशी भूमिका विजय सरदेसाई यांनी निलंबनानंतर मांडली आहे.

दुसऱ्या दिवशी पुन्हा मणिपूरsss मणिपूरsss
निलंबनाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विरोधक सभागृहात दाखल झाले त्यावेळी पुन्हा मणिपूरचा मुद्दा उचलून धरला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या विषयावर चर्चेचे आश्वासन विरोधातील आमदारांना दिल्यानंतर दिवसातील इतर कामकाजाला सुरूवात झाली. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी चर्चा केव्हा करणार याबाबत ठोस आश्वासन दिले नाही.

सत्ताधारी भाजपला घेरण्यास विरोधक यशस्वी?

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन अनेक कारणांनी चर्चेत राहिले, दुरूस्तीच्या कामामुळे अडचणीत सापडलेल्या कला अकादमीच्या खुला रंगमंचाचा छत अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर कोसळला आणि विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी चांगली संधी मिळाली. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ घातला. तसेच, कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

दरम्यान, गावडे यांनी कोसळलेला भाग कला अकादमीचा नाही तसेच, याची जबाबदारी त्यांच्या कडील खात्याची नसून बांधकाम खात्याची असल्याचे वक्तव्य केले. तसेच त्यांनी अटल सेतूमधील भ्रष्टाचाराचा देखील उल्लेख केल्याने विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलेच पेचात पकडले.

सुरूवातीलाच विरोधी पक्षातील आमदारांनी मणिपूर हिंसाचार आणि महिलेची नग्न धिंड काढल्याप्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, यातील दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात सांगितले.

बीबीसी डॉक्युमेंटरीचा ठराव
यावेळी सभागृहात वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंटरीचा ठराव देखील विरोधकांनी आणत चर्चा करण्यासह सर्व सदस्यांना डॉक्युमेंटरी वितरीत करण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाने ठरावाच्या विरोधात मतदान करत डॉक्युमेंटरी भारत विरोधी असल्याचे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed